अन्यथा.. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची बाह्ययंत्रणा पद्धतीने भरती करण्यास राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे.चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात यावी तसेच अनुकंपा, वारसाहक्क, वर्षानुवर्षे कंत्राटी काम करणा-यांना सेवेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहेत, ती पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. बाह्ययंत्रणा पद्धतीने भरती करण्याचा अध्यादेश रद्दबातल न केल्यास मंत्रालय,सर्व शासकीय कार्यालये तसेच अत्यावश्यक सेवादेखील बंद करू असा इशाराही संघटनेने दिला आहे.

याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना देण्यात आले आहे.शासनाचे  ३० सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची बाह्ययंत्रणा पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.या घातकी अध्यादेशामुळे राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.त्याचबरोबर या कर्मचा-यांची मोठ्या प्रमाणावर गळचेपी आणि दमनशाही सुरू होईल. सध्या वारसाहक्क, अनुकंपा आणि वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणा-यांना कायम करण्याची प्रक्रिया बंद आहे.ती राबविल्यास ही वेळ येणार नाही.चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची संख्या कमी आहे तसेच पदंदेखील भरणे बाकी आहे.पण ही पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.हा निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास मात्र राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करून मंत्रालयासह सर्व शासकीय सेवा ठप्प करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.

Previous article“लढून मरावं, मरून जगावं”हेच आम्हाला ठावं ; खा. संभाजीराजे भोसले
Next articleसुशांतसिंग प्रकरणात भाजपाचे षडयंत्र उघड;एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी