“लढून मरावं, मरून जगावं”हेच आम्हाला ठावं ; खा. संभाजीराजे भोसले

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना बीडमधील एका तरुणाच्या आत्महत्येने समाजाला हादरवून टाकले आहे. मराठा आरक्षणासाठी विवेक राहाडे या तरुणाने आत्महत्या केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरुणांना भावनिक आवाहन केले आहे. सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी मराठा समाजातील तरुणांना या लढाईत खचून जाऊ नये, असे म्हटले आहे. तसेच आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

“मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील.आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू हा लढा सुरू असताना,युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. एक लक्षात ठेवा हा समाज, “लढून मरावं, मरून जगावं” हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका”, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे. “आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी,उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल.

आपण लढाई जिंकूंच माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का?. या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. कोणीही असे पर्याय निवडू नयेत, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे”, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील तरुणाच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केले. दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही आक्रमक भूमिका घेत आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Previous articleमराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
Next articleअन्यथा.. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद करणार