मराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही,असा पवित्रा घेण्यात आला आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी उडी घेत थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले.या घटनेवर आक्रमक होत पार्थ पवारांनी आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

पार्थ पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. “मराठा आरक्षणासाठी विवेकने केलेल्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्काच बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांना जागे व्हावे लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलावी अशी विनंती आहे”, असे ट्वीट पार्थ पवार यांनी केले आहे. यावेळी त्यांनी आत्महत्या केलेल्या तरुणाचा फोटो आणि त्याचे पत्रही शेअर केले आहे. यासंदर्भातील दुस-या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, “विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण यंत्रणा खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मी आंदोलनाची धगधगती मशाल हृदयात ठेवून विवेक व इतर अनेक कोट्यावधी तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास तयार आहे”, अशी ग्वाही यावेळी पार्थ पवार यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे मराठा समाजाला हादरा बसला असून याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

Previous articleराज्यातील सिनेमागृहे,नाट्यगृहे लवकरच सुरु होणार
Next article“लढून मरावं, मरून जगावं”हेच आम्हाला ठावं ; खा. संभाजीराजे भोसले