राज्यातील सिनेमागृहे,नाट्यगृहे लवकरच सुरु होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई  : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.येणाऱ्या काळात सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरु करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे.राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी थिएटर्स ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स,थिएटर ओनर्स,फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशनसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य शासनाने राज्यातील सिनेमागृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या राज्यात अनलॉक-5 चा टप्पा सुरु आहे. राज्यशासनाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मात्र सिनेमागृहे व नाट्यगृहे मात्र बंद राहणार आहेत. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते. सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरु कशी करता येतील याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार आहोत,असेही देशमुख यांनी सांगितले.थिएटर्स मालकांना वेगवेगळया समस्या, अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या सहा महिन्यांपासून थिएटर्स बंद असल्याने थिएटर्स मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना येत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात येईल. थिएटर्स सुरु राहण्याबाबतचे लायसेन्स, वेगवेगळया परवानग्या यासारखे विषय प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येईल असे सांगून सांस्कृतिक कार्य मंत्री  देशमुख यांनी  थिएटर्स ओनर्स यांना आश्वस्त केले.थिएटर्स ओनर्स यांनी यावेळी बंद पडत असलेले सिंगल स्क्रिन थिएटर्स, सिंगल स्क्रिन थिएटर्स चालविताना येत असलेल्या अडचणी, थिएटर्स सुरु राहण्याबाबत देण्यात येणारे लायसेन्स,वीज बिल, मालमत्ता कर, विविध परवाने याबाबत येत असलेल्या समस्या मांडल्या.

Previous articleनाव रामाचं घ्यायचं कृती मात्र नथुरामाची करायची ;जयंत पाटलांचे भाजपावर टीकास्त्र
Next articleमराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा