रेमडेसिवीर इंजेक्शन कुठेच मिळत नाही ? तुम्हाला गरजेचे आहे,तर या हेल्पलाईनवर करा फोन

मुंबई नगरी टीम

मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध कोवीड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकते नुसार गरजुंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त जे.बी.मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसासाठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जात असल्याचेही मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या औषधाच्या विक्री, वितरण व साठ्यावर आणि काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासन विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. सदर औषधाचे वितरण फक्त रूग्णालय व संस्था यांनाच करण्यासाठी अनुमती दिलेली आहे.

आजतागायत प्रशासनामार्फत यापूर्वी काही प्रकरणी जप्ती व छाप्यांची कारवाई केली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपींना पोलीसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे.प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात २४X७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा क्रमांक ०२२-२६५९२३६४ आहे तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ हा उपलब्ध आहे. तरी रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाईल तसेच काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सह आयुक्त मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleबाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला हरताळ फासण्याचे काम संजय राऊतांनी केले
Next article१५ ऑक्टोंबरपासून शाळा  सुरू होणार ; मार्गदर्शक सूचना जारी