महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या पांडेच्या निवडणूक प्रचाराला फडणवीस जाणार का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा वैद्यकीय अहवाल एम्सकडून देण्यात आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.या प्रकरणात बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी केली. राजीनामा देऊन ते बिहारची निवडणूक लढवत आहेत.त्यांच्या निवडणूक प्रचाराला आता भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस जाणार का ?, असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे.या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत त्यांनी महाराष्ट्र आणि पोलिसांची बदनामी करणाऱ्यांवर टीका केली.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांनी हस्तक्षेप करत कशा प्रकारे मुंबई पोलिसांची बदनामी केली याचा अनिल देशमुख यांनी समाचार घेतला. “गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. जे बिहारचे पोलीस प्रमुख होते,ते आता निवडणूक लढवत आहेत. देवेंद्र फडणवीस हे बिहारचे निवडणूक प्रभारी आहेत. माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडे यांच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?”, असे म्हणत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी जनतेची माफी मागावी. अन्यथा जनता त्यांना माफ करणार नाही, असेही अनिल देशमुख म्हणाले.

सुशांत प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे काम भाजपने केले, असे सांगताना अनिल देशमुख यांनी अमेरिकेतील विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टचा हवाला यावेळी दिला. यामध्ये राजकीय पक्ष आणि काही प्रसारमाध्यमे यांनी सुशांत प्रकरण उचलून धरले असल्याचे म्हटले आहे. राजकीय पक्ष आणि काही प्रसारमाध्यमांच्या नावाचा समावेश देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान,”एम्सचा अहवाल जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा अहवाल पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. सीबीआयचा अंतिम अहवाल काय असेल याची सर्वजण वाटत पाहत आहे. सीबीआयने लवकरात लवकर अहवाल जाहीर करावा, अशी आमची विनंती आहे. त्यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हे देखील स्पष्ट होईल”, असे देशमुख म्हणाले.

Previous articleतरच.. गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्याची हिंमत करावी
Next articleशिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न,भाजपच्या माजी मंत्र्यांचा खळबळजनक आरोप