तरच.. गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्याची हिंमत करावी

मुंबई नगरी टीम

पुणे : सुशांतसिंह प्रकरणात अजून सीबीआयचा अहवाल आलेला नाही.एम्सने अहवालाबाबत सीबीआयला विचारावे,असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे अजून सीबीआयकडून काहीही उत्तर आलेले नसताना गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रतिक्रिया देण्याची घाई का ? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, बाळंतपण झालेले नसतानाच बाळाला पाळण्यात घालून नाव ठेवण्यासारखा प्रकार अनिल देशमुख का करीत आहेत, हे ठावूक नाही.सुशांत प्रकरणाच्या निमित्ताने एनसीबी, सीबीआय एका ड्रग रॅकेटवर काम करते आहे. त्यांना पाठिशी घालण्यासाठी अनिल देशमुख दबाव आणत आहेत का? हे सरकार ड्रग्ज माफियांना पाठिशी घालते आहे का ? याचे उत्तर आधी अनिल देशमुखांनी द्यावे आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्याची हिंमत त्यानंतर करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन परीक्षा आणि मराठा आरक्षणावर बोलताना दरेकर म्हणाले ऑनलाईन परीक्षेबाबत जो गोंधळ उडालेला आहे त्यास सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागला आहे. शिक्षणमंत्र्यांच याकडे लक्ष नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्यचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व नुकसानीची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी आणि त्यांचे वर्ष फुकट जाणार नाही याची दक्षता घेऊन यातून मार्ग काढावा अशी मागणीही त्यांनी केली. मराठा क्रांती मोर्च्याने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकारकडे केलेली मागणी योग्य आहे. सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे मराठा समाजाच्या तरुणांना याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन परीक्षा पुढे ढकलाव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous article१५ ऑक्टोंबरपासून शाळा  सुरू होणार ; मार्गदर्शक सूचना जारी
Next articleमहाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या पांडेच्या निवडणूक प्रचाराला फडणवीस जाणार का ?