मुंबई नगरी टीम
अहमदनगर : राज्यातील कोरोनाची ही परिस्थिती चिंताजनक. ती रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. या मुद्द्यावरूनच भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे कॅप्टन आहेत,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगतात.मात्र कॅप्टन काही घराबाहेर पडत नाही आणि त्यांना बाहेर फिरू देखील दिले जात नाही. शरद पवार मात्र या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात फिरतात. त्यामुळे शिवसेना संपवायची आणि राष्ट्रवादीची ताकद वाढवायची, असा हेतू यातून दिसत आहे. तसा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात असल्याचा आरोप शिवाजी कर्डीले यांनी केला आहे.
अहमदनगर तालुक्यातील खडकी येथील एडीसीसी बँकेतील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवाय या सगळ्यात राष्ट्रवादीची रणनीती काय आहे यावर भाष्य करत त्यांनी खळबळजनक आरोपही केला आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरेल आहे. केवळ मी नाही तर, सर्वमान्य जनता देखील हे बोलत आहे. रुग्णांना बेड, ऑक्सिजन उपलब्ध होत नाहीत. आयसीयूची व्यवस्था नाही. औषधे देखील वेळेवर मिळत नसून लाखो रुपये रुग्णालयाला द्यावे लागतात. यावरून सरकार अपयशी ठरले असल्याचे पाहायला मिळते, अशी टीका शिवाजी कर्डीले यांनी केली आहे.
कोरोनाकाळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीवरही त्यांनी यावेळी बोट ठेवले. राज्यात अशी परिस्थिती असताना देशाचे नेते शरद पवार हे मुख्यमंत्री या राज्याचे कॅप्टन आहेत, असे सांगतात. पंरतु कॅप्टन काही घराबाहेर पडत नाही. शिवाय त्यांना बाहेरही फिरू दिले जात नाही. मात्र शरद पवार स्वतः या वयात जिल्ह्याजिल्ह्यात फिरतात. शिवसेना संपवायची आणि राष्ट्रवादीची ताकद वाढवायची असा हेतू यामागे दिसत आहे. तसा प्रयत्न देखील राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप शिवाजी कर्डीले यांनी केला.