एक राजा बिनडोक, तर दुसरा…, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाची मागणी समाजाकडून केली जात आहे.यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडर यांनी दोन्ही राजेंवर निशाणा साधला आहे.दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे,असे मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. तर दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे,पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत,अशी टीका प्रकाश आंबडेकर यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबाही जाहीर केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मराठा समाजाच्या वतीने १० ऑक्टोबरला मोर्चा काढला जाणार आहे. याला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून दोन्ही राजांच्या नेतृत्त्वाविषयी देखील भाष्य केले आहे.”दोन्ही राजेंचा आंदोलनाला पाठिंबा आहे,असे मला वाटत नाही.एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजीराजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे.पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे दिसत आहे.ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा, असे ते म्हणतात. त्यावरून भाजपाने यांना राज्यसभेवर कसे पाठवले ? हाच प्रश्न उपस्थित होतो”, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. तर मी कोणालाही अंगावर घेण्यास घाबरत नाही, असेही ते म्हणाले.

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षण समितीमधील सुरेश पाटील यांनी काल फोन करून १० ऑक्टोबरच्या मोर्च्याला पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असल्याचे प्रकाश आंबडेकर म्हणाले. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण वेगळे आहे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या राहतील. ओबीसी आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी होणार नाही. याची दक्षता सुरेश पाटील यांनी घ्यावी, असे आंबेडकर म्हणाले.

Previous articleराज ठाकरेंचा मंत्री उदय सामंतांना फोन,ग्रंथालये सुरू करण्याचे दिले आश्वासन
Next article२ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद