देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा क्राईम रेट कमी : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई नगरी टीम

मुंबई : देशाचा गुन्हे दर वाढत असताना महाराष्ट्राचा गुन्हे दर मात्र २०१८-१९ च्या तुलनेत तोच राहिला असून महाराष्ट्र हे आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हे दर केरळ, तेलंगाणा, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांचा आहे. तसेच राज्याचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दर हा वाढला असून २०१८ मध्ये जो ४१.४१ होता तो २०१९ मध्ये ४९ टक्के झाला असून महाराष्ट्र राज्याचा क्रमांक ११ वा आहे.यात कर्नाटक ३६.६, मध्यप्रदेश ४७.००, गुजरात ४५.६,तेलंगाणा ४२.५ टक्के असा दर आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 २०१९ मध्ये देशात हिंसाचाराच्या एकूण ४.१७ लाख गुन्ह्यांची नोंद झाली.तर राज्यात २०१९ मध्ये हिंसाचाराचा गुन्हे दर केवळ ३६ होता आणि राज्य ११ व्या क्रमांकावर होते. सन २०१९ मध्ये देशाचा खूनासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये गुन्हे दर २.२ असा होता. त्यात महाराष्ट्राचा गुन्हे दर केवळ १.७ असून महाराष्ट्र राज्य हे २५ व्या क्रमांकावर होते. तर खुनाचा प्रयत्न संदर्भातील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्राचा १७ वा क्रमांक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत प्रती लक्ष महिला लोकसंख्यामागे महाराष्ट्र राज्य १३ व्या क्रमांकावर आहे. सन २०१९ मध्ये बलात्काराचे  राजस्थानमध्ये ५९९७, उत्तरप्रदेश ३०६५, मध्यप्रदेश २४८५, आणि महाराष्ट्र २२९९ असे गुन्हे नोंदविले आहेत. या २२९९ गुन्हेगारांपैकी २२७४ गुन्हेगार हे परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी असे ओळखीचे आहेत तर केवळ २५ गुन्हेगार अनोळखी आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर ३.०९ असून महाराष्ट्र २२ व्या क्रमांकावर आहे. इतर राज्यांचा गुन्हेदर केरळ ११.६, हिमाचल प्रदेश १०, हरियाणा १०.९, झारखंड ७.७, मध्यप्रदेश ६.२ असा आहे.

संपूर्ण देशात २०१९ मध्ये भा.दं.वि.चे ३२.२५ लाख गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर २७८.४ असून महाराष्ट्र राज्य 8व्या क्रमांकावर (प्रतीलाख लोकसंख्येनुसार) आहे. यात मध्यप्रदेश, हरियाणा, केरळ, राजस्थान, तेलंगाणा यांचा दर जास्त आहे तर उत्तरप्रदेश हे राज्य भा.दं.वि.च्या गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आर्म्स ॲक्ट अंतर्गत अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचा ९ वा क्रमांक आहे. यात महाराष्ट्रात केवळ ९१० गुन्ह्याची नोंद आहे. तर उत्तरप्रदेश २५,५२४, मध्यप्रदेश ३८४७, बिहार २९७६, राजस्थान २०१९ असे गुन्हे नोंद आहे. एकूणच ही आकडेवारी पाहता महाराष्ट्र राज्य गुन्हेगारी रोखण्यामध्ये निश्चितच यशस्वी झाले आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

Previous articleओबीसी आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार 
Next articleआरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला; आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेणार