एकनाथ खडसेंच्या पाठोपाठ लेकीचाही राष्ट्रवादीत प्रवेश ? रोहिणी खडसेंनी दिले संकेत

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे.अशातच स्वतः रोहिणी खडसे यांनी सूचक संकेत दिला आहे.तर खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे मात्र भाजपमध्येच राहणार आहेत. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह आणखी कोणकोण राष्ट्र्वादीत जाणार हे अद्याप समजलेले नाही. पंरतु

खडसेंसह त्यांची कन्याही पक्षप्रवेश करेल, असे बोलले जात आहे.रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून नवा फोटो शेअर केला आहे.यामध्ये त्या घड्याळाकडे बघताना दिसत आहेत. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आहे. त्यामुळे घड्याळाकडे पाहून रोहानी खडसे नेमकं काय सूचित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी विचारणा नेटकऱ्यांकडून केली जात आहे. रोहिणी यांनी या फोटोला कोणतेही कॅप्शन दिलेले नाही किंवा पोस्टही लिहलेली नाही. त्यामुळे फोटोच्या माध्यमातून त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर रोहिणी खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या व्यक्तीने ४० वर्षे पक्षनिष्ठेने काम केले त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणं स्वाभाविक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथभाऊंनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला, असे रोहिणी खडसे म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाण साधला. विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरही मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करूनही पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी रोहिणी खडसे यांनी आपण भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार, असे सांगितले आहे.

Previous articleएकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Next article‘हे चिल्लर..थिल्लर’,त्याकडे बघायला मला वेळ नाही;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला