मुंबई नगरी टीम
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र येत्या काही दिवसांत ते भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.भाजपचे १० ते १२ आमदार संपर्कात असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.त्यामुळे खडसेंनंतर भाजपमध्ये आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे भाजप सोडताच एकनाथ खडसेंची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेली नाराजी अधिक तीव्रपणे व्यक्त केली जात आहे. आपण राष्ट्रवादीत गेलो ही अनैतिकता आणि अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेता ही नैतिकता का ? असा रोखठोक सवालखडसे यांनी फडणवीसांना विचारला आहे.आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी उद्या होणा-या राष्ट्रवादी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा फडणवीसांवर आगपाखड केली आहे.भाजपचे १० ते १२ आमदार संपर्कात असल्याचा दावा यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे.त्यामुळे खडसेंनंतर भाजपमध्ये आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यत वर्तवली जात आहे. भाजपचे १० ते १२ आमदार माझ्या संपर्कात आहेत. मात्र पक्षांतर बंदी कारणामुळे त्यांना तूर्तास सोबत येता येणार नाही.निवडणुकाही त्यांना परवडणार नाहीत.शिवाय भाजपचे काही माजी आमदार माझ्यासोबत उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. असा खुलासा खडसेंनी यावेळी केला. एकनाथ खडसे यांना समर्थन देणाऱ्या नेत्यांचा व कार्यकत्यांचा वर्ग मोठा आहे. त्यामुळे खडसेंसह आणखी कोणकोण राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची चर्चा सुरू आहे.
खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्याचे कारण म्हणजे,ते नेते होते, मुख्यमंत्री होते. त्यांनी इतरांना क्लीन चिट दिली तशी मलाही देता आली असती. विनयभंगाचा गुन्हा दाखल करतानाही चुकीचे काम करू नका असे ते सांगू शकले असते. पण त्यांनी गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली. तीन महिन्यात मंत्रिमंडळात परत घेऊ,असे आश्वासनही त्यांनी दिले.परंतु विश्वास ठेवूनही विश्वासघात व्हायचा, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. तसेच विधानसभेनंतरही शिवसेनेसोबत युती असती तर दोन, तीन वर्ष आम्ही सरकारमध्ये असतो. तर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला हवे होते. अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेता ही नैतिकता, आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का?, असा सवाल खडसेंनी केला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. तसेच एकनाथ खडसेंनी आपल्याला व्हिलन ठरवले असून माझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला हवे होते, असे फणडवीस यांनी म्हटले. यावर देखील खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, अरुण जेटली, सुषमा स्वराज, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांकडे आपण अनेकदा गा-हाणी मांडली. सर्वांनी या तक्रारी ऐकून घेतल्या खरं, पण कोणीही माझ्यावरील अन्याय दूर केला नाही. उलट वरिष्ठांचे तुमच्याबद्दलचे मत वाईट झाले असून तुम्ही काय ते समजून घ्या, असे एका नेत्याने आपल्याला खाजगीत सांगितले, असेही एकनाथ खडसेंनी स्पष्ट करत फडणवीसांना फटकारले आहे.