एकनाथ शिंदे शिवसेनेला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत;खासदार,आमदार,नगरसेवक शिंदे गटात ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने ठाकले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.शिंदे गटाच्या होणा-या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे एक ज्येष्ठ खासदार,दोन आमदार आणि काही माजी नगरसेवक शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याने शिवसेना कमकुवत झाली आहे.त्यातच राज्यात सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईसह पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देत आहेत.मुंबईतही त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देतानाच काही राजकारण्यांच्या घरी जावून बाप्पांचे दर्शन घेतले.या भेटीवेळी त्यांनी शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांशी संपर्क साधत नव्या समीकरणास सुरूवात केली आहे.दरवर्षी शिवाजी पार्क येथील मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडतो.मात्र यावेळी शिंदे गटाने या मैदानावर दावा सांगत याच ठिकाणी शिंदे गटाचा दसरा मेळावा घेण्याचा दावा केला.तर शिवाजी पार्कांत शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.शिवाजी पार्कांतील मैदान मिळण्याची शक्यता धुसर असल्याने अखेर शिंदे गटाने बांद्रा कुर्ला संकुलातील मैदान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.मात्र याठिकाणी होणा-या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा दणका देण्याची तयारी केली असल्याचे समजते.

बांद्रा कुर्ला संकुलातील मैदानात होणा-या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे एक खासदार,दोन आमदार तर काही माजी नगरसेवक शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले मुंबईतील एक ज्येष्ठ खासदार,दोन आमदार आणि काही माजी नगरसेवक शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या तीन लोकप्रतिनिधींसह काही शिवसेना नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने सत्तासंघर्षानंतर शिवसेनेला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तब्बल ४० आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली.या दणक्यानंतर १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.काही महत्वाच्या नेत्यांनीही शिवसेना सोडत शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर आता मुंबईतील शिवसेनेचे एक ज्येष्ठ खासदार तर राज्यातील इतर भागातील दोन आमदार शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Previous article११६६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १३ ऑक्टोबरला मतदान ; थेट सरपंचपदांची निवड होणार
Next articleबारामतीत एखाद्यावेळी सुर्य पश्चिमेकडे उगवेल मात्र बारामती शरद पवारांना सोडणार नाही