मुंबई नगरी टीम
जळगाव: गेल्या चाळीस वर्षापासून भाजपला सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून रूजविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.तर दुसरीकडे ४० वर्षापासून खडसे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर असणारे कमळाचे चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खाली उतरविण्यात आला आहे.
खडसे यांच्या भाजपला सोडचिठ्ठी देण्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा दणका बसला आहे.तर दुसरीकडे या जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची शक्यता आहे.गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत महाराष्ट्रभर दौरे करून एकनाथ खडसे यांनी भाजपला सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले मात्र त्यांना एमआयडीसी जमीन प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.दोन ते तीन महिन्यात खडसे यांची मंत्रिमंडळात वापसी होईल अशी चर्चा होती मात्र विधानसभेच्या निवडणूकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.गेल्या चाळीस वर्षापासून कार्यकर्त्यांनी नेहमी गजबजून जाणारे मुक्ताईनगर मधील त्यांचे कार्यालया काल पुन्हा गर्दीने फुलून गेले आहे.मात्र सध्याचा माहोल वेगळा आहे,पार्श्वभूमी वेगळी आहे.
मुक्ताईनगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयावर असलेले भाजपचे फलक रातोरात हटवण्यात आले आहेत.खडसे गेल्या ४० वर्षांपासून याच कार्यालयातून जनतेशी संवाद साधायचे.त्यामुळे मुक्ताईनगरचे हे कार्यालय आणि भाजप हे जणू अविभाज्य समीकरण झाले होते.मात्र खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच प्रवेश करण्याचा निर्णय घेताच खडसेंच्या समर्थकांनी संपर्क कार्यालयावरील कमळाचे चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक खाली उतरवले आहेत.खडसे हे उद्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी काल भाजपचा राजीनामा देताच कालपासून खडसे यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड रेलचेल सुरु असून, गेल्या दोन दिवसांपासूनच मुक्ताईनगर मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ‘नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण’ असे बॅनर समर्थकांनी शहरभरात लावले आहेत.