मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत स्वपक्षीयांनी केलेल्या राजकारणाला वाचा फोडली.तर आता भाजपकडूनही खडसेंबाबत अनेक मोठे खुलासे केले जात आहेत.मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने खडसेंनी खंत व्यक्त केली होती.परंतु मुख्यमंत्रीपद न मिळण्याला स्वतः खडसेच जबाबदार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी उघड केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नाथाभाऊ भाजप सोडून का गेले याला अनेक कारणे आहेत,असे सांगताना त्यांना न मिळालेल्या मुख्यमंत्री पदाबाबत रावसाहेब दानवेंनी भाष्य केले. एकेकाळी भाजपमध्ये केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. पण भविष्यात भाजपची सत्ता येईल की नाही याची शंका त्यांना होती. त्यामुळे त्यांनी तब्येतीचे कारण देत लालदिव्यासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडले. त्यानंतर हे पद देवेंद्र फडणवीसांकडे आले. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री केले जाते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी जर खडसेंनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले असेत तर त्यांना मुख्यमंत्री पदावर दावा करता आला असता, असे दानवेंनी म्हटले. मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने खडसे नाराज होते. मात्र त्यांच्याकडे अर्ध्याहून अधिक महत्त्वाची खाती होती. परंतु त्यांना फडणवीस सरकारशी जुळवून घेता आले नाही, असेही दानवे म्हणाले.
नाथाभाऊ मुळचे राष्ट्रवादीचेच!
रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे नाथाभाऊ हे मुळचे राष्ट्रवादीचेच असल्याचे दानवेंनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एस काँग्रेसची स्थापना केली होती. त्यात नाथाभाऊ होते. त्यावेळी शरद पवारांनी नागपूर ते पंढरपूर दिंडी काढली होती. त्यातही नाथाभाऊ होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच पक्षात मी त्यांना सिनियर आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर, एकनाथ खडसे आदी आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहीत आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
एकनाथ खडसेंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा
नाथाभाऊ ज्या पक्षात गेले आहेत त्यांनी त्यांचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांवर टीका करण्यासाठी करू नये, असा सल्ला यावेळी रावसाहेब दानवेंनी राष्ट्रवादीला दिला. दरम्यान, एकनाथ खडसे भाजप सोडून गेले असले तरी, त्यांच्यामुळे पक्ष थांबणार नाही, असे स्पष्टीकरण दानवेंनी दिले. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नसण्याने आज काही पक्ष थांबलेला नाही. तसेच आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंती नाही. पण नाथाभाऊ गेल्याचे दुःख आहे, असेही रावसाहेब दानवेंनी सांगितले.