मुंबई नगरी टीम
जळगाव : एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला दणका बसला आहे. त्यामुळे पक्ष संघटन मजबुतीसाठी भाजपने हालचाल सुरू केलेली पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. खडसेंच्या पक्षांतरानंतर जिल्ह्यात भाजपने ही पहिली बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला खडसेंच्या सून रक्षा खडसे या गैरहजर राहिल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात होते. यावर अखेर भाजप आमदार गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रक्षा खडसेंच्या गैरहजेरीबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले, रक्षा खडसे या सोमवारी रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना आधीच माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीवर असे तर्कवितर्क काढणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. तसेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपल्या गावी परतलेले एकनाथ खडसे त्यांचे स्वागत देखील रक्षा खडसे यांनी केले होते.
यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याविषयी देखील भाष्य केले. खडसे यांच्या जाण्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठे खिंडार पडले असे बोलले जात आहे. पंरतु एकनाथ खडसे यांच्या जाण्याने भाजपला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले. भाजप हा व्यक्ती केंद्रित पक्ष नसून विचारांवर चालणार पक्ष आहे. त्यामुळे कुणा एकाच्या जाण्याने पक्षाच्या संघटनेवर परिणाम होणार नाही, अशी भूमिका यावेळी गिरीश महाजन यांनी मांडली. दरम्यान, राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलेले एकनाथ खडसे हे अॅक्शन मोडमध्ये आले असून जळगावात आल्यानंतर त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपने देखील आपली नवी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.