मुंबई नगरी टीम
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षातील नेते पुन्हा आमने सामने आले आहेत. शरद पवारांविषयी आपल्याला चुकीचे बोलायचे नव्हते असे सांगताना राष्ट्रवादीने भाजप नेत्यांवर केलेल्या टीकांची आठवण चंद्रकांत पाटील यांनी करून दिली होती. यावर आता जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देत आपल्याला त्यांच्याबद्दल चुकीचे बोलायचे नव्हते, असे म्हटले. आपण कायदेशीर तरतुदींबाबत बोलत होतो. मात्र राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधान, गृहमंत्र्यांवर टीका करतात. मला चंपा तर देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात, हे कसे काय चालते? असा सवाल त्यांनी केला होता. यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. मात्र चंद्रकांत दादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी याचा राग मानून घेऊ नये, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.
आम्ही वीज बिलाबाबत मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहोत. पण मागील सरकारने काम केले असते, तर ही वेळ आली नसती, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच वीज बिलाबाबत नक्कीच मार्ग काढू अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुन्हा लॉकडाउन होणार की नाही यावरही त्यांनी भाष्य केले. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन हा सुयोग्य पर्याय नाही. नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करावे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखता येईल, असे आवाहन त्यांनी केले.