मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठा आरक्षण संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली. यावेळी बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना बैठकीत झालेल्या मुद्द्यांविषयी माहिती दिली. मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचे नुकसान होऊ नये, हीच माझी प्रामाणिक भावना आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
गेल्या १० ते १५ दिवसांतील उच्च न्यायालयाचे निर्णय आलेले आहेत. त्या अनुषंगाने चर्चा झाली. आर्थिक मागास प्रवर्ग किंवा सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्ग या दोघांपैकी एक काहीतरी होईल, दोन्ही मिळणार नाही. निकालाचा सारांश असा आहे. न्यायालयाचा निर्णय आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासंदर्भात आलेल्या विविध मागण्या आणि काही मागण्यांबाबत चर्चा झाली, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. भाजप खासदार संभाजीराजेही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. यांसंदभार्तील त्यांचेही काही विषय असतील ते तपासून पाहू, असेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळीस म्हणाले होते की, हा विषय शेवटी न्यायालयात जाऊनच सुटणार आहे. त्यांची त्यावेळची भूमिका आणि आताची भूमिका यामध्ये फार फरक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयात चार वेळा लेखी दिले आहे. कोरोनामुळे सुनावणी व्हिडीओद्वारे होत आहे. त्यामुळे जोवर घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोवर याला चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील आणि सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.