मराठा आरक्षण : तरुणांच्या मदतीसाठी सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा, संभाजीराजेंची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती तात्काळ उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावर जानेवारीत निर्णय दिला जाईल. तोवर मुलांचे फार नुकसान होईल.त्यामुळे त्यांना इतर माध्यमातून कशी मदत देता येईल, याचा निर्णय सरकारने युद्धपातळीवर घ्यावा,अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. तसेच सरकारी वकिलांनी आपली बाजू चांगली मांडली असे सांगताना वकिलांनी मग पुढची तारीख का मागितली, असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. मात्र पाच सदस्यीय घटनापीठाने आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. यावर प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना संभाजीराजे म्हणाले की, मुलांचे खूप नुकसान होत आहे, त्यांच्यात आक्रोश निर्माण होत असून पुढे काय करायचे हे त्यांना कळत नाही आहे. त्यामुळे निर्णय येईपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल, यावर सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा, अशी विनंती संभाजीराजेंनी केली आहे. सरकारी वकिलांनी आपली बाजू चांगली मांडली यात काही दुमत नाही. मात्र बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडला असल्याचे ते म्हणाले. पुढची तयारी करायची म्हणून पुढची तारीख मागितली का? की दुसऱ्या कुठल्या विषयासाठी मागितली हे त्यांनी स्पष्ट करावे.

निर्णय येत नाही तोवर सरकार या तरुणांसाठी काय करणार आहे, काय मदत देणार आहे हे त्यांनी सांगावे. महाविद्यालये सुरू झाली आहेत. सुनावणी आणखी किती दिवस चालेल सांगू शकत नाही. अनेक प्रश्न डोळ्यासमोर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल सकारात्मक चर्चा झाली. पण पुढे काय करायचे हे सरकारने स्पष्ट करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. दरम्यान मराठा आरक्षणावरील स्थगिती न उठल्याने विरोधकांनी पुन्हा ठाकरे सरकारला घेरले आहे.

Previous articleमराठा आरक्षणप्रश्नी तूर्तास दिलासा नाही, तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Next articleमहाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार : चंद्रकांत पाटील