मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : देशात शेतकरी आंदोलन तापलेले असताना भाजप नेते उलटसुलट वक्तव्य करत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर सध्या टीकेची झोड उठवली जात आहे. रावसाहेब दानवे यांना घरात घुसून चोपले पाहिजे, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
“गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. तेव्हा त्यांच्या घराभोवती आम्ही घेराव घातला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपले पाहिजे”, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्याला पाठिंबा मिळत आहे. अशावेळी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे म्हणणे शेतकऱ्यांचा अपमान आहे. दानवे हे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे हे जाणून घेण्यासाठी त्यांचा डीएनए तपासणे गरजचे आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही रावसाहेब दानवे यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. शेतकरी स्वतःच्या हितासाठी लढत असताना, भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून येऊन या लोकांना प्रेरित करतात, असे जर तुम्ही म्हणत असाल, तर तुमची विचासरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देता, अशी टीका त्यांनी केली आहे. सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा शांत राहणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.