मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजप आमदारांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंग होईल,अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांना धारेवर धरले आहे. अजित पवार यांच्यासह पहाटेचा शपथविधी उरकून दुसऱ्यांदा सत्तेत आलेले फडणवीस सरकार हे अवघ्या कमी वेळातच कोसळले.ही बाब भाजपच्या आजही जिव्हारी लागत असून हा दणका ते विसरले नाहीत.त्यामुळे याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अजित पवारांना टोला हाणत आहेत.
आमदार फोडाफोची चर्चा सुरू असतानाच निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करत अजित पवारांना लक्ष्य केले. “अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही, तो माणूस आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करतो”, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. भाजपचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील,त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपचा पराभव करू, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर राणेंनी हे टीकास्त्र डागले.
अजित पवार यांची ताकद असती तर त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार टिकले असते. ते सरकार ८० तासांचे ठरले नसते, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना चिमटा काढला. इतकेच नव्हे तर, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हिम्मत असेल तर २६ जानेवारीपर्यंत आमचा एकतरी आमदार फोडून दाखवा, अन्यथा राजीनामा द्या, असे खुले आव्हानच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. त्यामुळे आता भाजपमधून राष्ट्रवादीत कोण येणार का? आणि असेल तर ते नेमके कोण असतील याची उत्सुकता लागून आहे.