मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा प्रयोग केला खरा, पण त्यांचा एकही माणूस निवडून आला नाही. लोकसभेला वंचितला जेवढी मते मिळाली त्याच्या निम्मी मतेही त्यांना विधानसभेला मिळाली नाहीत. त्यामुळे एकट्याच्या जीवावर सत्ता शक्य नाही. प्रकाश आंबेडकर यांना ऐक्य करायचे नसेल तर त्यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रामदास आठवले सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला.
प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करतानाच आठवले यांनी रिपब्लिन पक्षांचे ऐक्य होऊ शकणार नाही, याचा देखील पुनरुच्चार केला. रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांची ओळख आहे. ती ओळख मी कधीही पुसणार नाही. माझा रिपब्लिकन पक्ष संपवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. पण मी देशाच्या कानाकोपऱ्यात माझा पक्ष पोहचवणार आणि समाजाची कामे करणार, असे ते म्हणाले. तर ज्यांनी आपल्या पक्षाच्या नावातूनच रिपब्लिकन काढून टाकले त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी, असा टोलाही त्यांनी लगावला. आपण ऐक्यासाठी कधीही तयार नाही, असे आठवलेंनी सांगितले. तसेच वंचितचा फोल गेलेला प्रयोग पाहता त्यांनी एनडीएत आले पाहिजे, असा सल्ला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे. दोघे मिळून समाजाचे प्रश्न सोडवू, अशी साद आठवलेंनी घातली.
यावेळी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या युपीए अध्यक्षपदाच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. युपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना द्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. मात्र शिवसेना युपीएचा घटक नाही. शिवसेनेच्या या मागणीमुळे काँग्रेस ठाकरे सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. यासह आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि शिवसेनेचा पराभव होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.