‘मुंबई मा जलेबी ना फाफडा,उद्धव ठाकरे आपडा’,मनपा ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनेने कसली कंबर

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडताना दिसत आहे.तर दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अनेक पक्ष आपली मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत.यात शिवसेना देखील मागे नाही.आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने पाऊल उचलले आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा,उद्धव ठाकरे आपडा’, असे म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना आपल्याकडे वळवण्याची तयारी केली आहे.

भाजपसोबत युती तुटल्याने २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला तगडे आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनेने भाजपच्या पारंपरिक गुजराती मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने गुजराती लोकांसाठी एका मेळाव्याचे आयोजन केले आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, अशी टॅगलाईन या मेळाव्यासाठी वापरण्यात आली आहे. येत्या १० जानेवारीला जोगेश्वरीत हा मेळावा पार पडणार आहे. त्यासाठी मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषेत निमंत्रणे देखील छापण्यात आली आहेत. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे या मेळाव्यात जाहीर प्रवेश देखील पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

दरम्यान, अमराठी मतदारांना आकर्षित करण्याची शिवसेनेची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वरळीत ‘केम छो वरळी’, असे बॅनरही लावण्यात आले होते. ज्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीत सत्तेत आलेली शिवसेना सध्या सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा नारा देताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत अमराठी मतदारांचा फटका बसण्याआधीच शिवसेनेने आपली खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Previous articleपुणे शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांचे विभाजन;नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी
Next articleप्रदेशाध्यक्ष पदासाठी तरुण नेतृत्वाला संधी द्या,राजीनाम्याच्या वृत्तावर थोरातांनी मौन सोडले