सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा ‘हा’ नवा फॉर्म्युला विचाराधीन

मुंबई नगरी टीम

मुंबई : नवीन वर्ष उजाडले तरी मुंबई लोकल सर्वांसाठी केव्हा सुरू होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. लोकल सगळ्यांसाठी सुरू व्हावी, याच्या प्रतिक्षेत सर्वसामान्य आहेत. अशातच लोकल संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कमी गर्दीच्या वेळेत सरसकट सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार सकाळी ७ वाजेपर्यंत ते रात्री १० वाजल्यानंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येऊ शकतो,असा फॉर्म्युला विचाराधीन आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नवीन वर्षात लोकल सुरू होण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यास सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वांच्या लोकल प्रवासासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी ७ वाजेपर्यंत ते रात्री १० नंतर सर्वांना लोकल प्रवास करता येऊ शकतो. या काळात रेल्वेवरील ताण कमी असतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक पसरण्याचा धोका तुलनेने कमी आहे. केंद्र सरकार देखील याची चाचपणी करत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच मुंबई लोकलचे नवे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी रखडलेली आहे. कोरोनाच्या स्थितीतून मुंबई शहर हळूहळू सावरत आहे. त्यामुळे मुंबई लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. १५ डिसेंबरनंतर १ जानेवारीपासून लोकल सुरू होईल, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. परंतु सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी मुंबई लोकलला अद्याप हिरवा सिग्नल मिळालेला नाही. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. तसेच अनेक उद्योगधंदेही पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे लवकर मुंबईची लाईफलाईन सर्वांसाठी सुरू व्हावी, हीच मुंबईकरांची इच्छा आहे.

Previous articleशिवसेनेचा आणखी एक नेता पीएमसी घोटाळ्याचा लाभार्थी,भाजप नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
Next articleखंडणी प्रकरण : कर नाही त्याला डर कशाला ? गिरीश महाजनांवर शिवसेनेचे बुमरँग