येत्या आठवड्यात लोकल सुरू करा ! अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा प्रविण दरेकरांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.दुकाने,खासगी कार्यालये तसेच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे. परंतु कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत निर्णय राज्य सरकारने आठवड्याभरात घ्यावा अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, कल्याण ते सीएसएमटीपर्यंतच्या २५ रुपयांच्या दैनंदिन उपनगरीय रेल्वे प्रवासाला आज एका व्यक्तीला २५० रुपयांहून अधिक खर्च होत आहे. डोंबिवली, ठाणे येथील लोकांना कामासाठी मुंबईत यायचं झालं तर रेल्वे सुविधा उपलब्ध नाही. सुमारे ७०० ते ८०० रुपये टॅक्सी व खासगी वाहनांसाठी जात असून त्यांना नाईलाजस्तव महागडा रस्ते प्रवास करावा लागत आहे. बसने प्रवास करायचा झाला तरी मर्यादित बस फेऱ्यांमुळे तीन ते चार तासांचा वेळ प्रवासात जात असल्यामुळे नागरिकांचे प्रवास हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी तातडीने निर्णय घेऊन ज्यांचे लसीचे २ डोस पूर्ण झाले आहेत त्यांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दरेकर यांनी केली. यावेळी भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

मुंबईतील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक, मार्केटमधील दुकानदार आदी हातावर पोट असलेल्या वर्गासाठी उपनगरीय लोकल उपलब्ध नाही. यामुळे हा प्रवासीवर्ग अडचणीत आला आहे. महिन्याला १५ ते २० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न,त्यातच महागड्या प्रवासाचा भार यांमुळे घर चालवायचे ? मुलांचे शिक्षण करायचे,की प्रवास खर्च भागवयाचा असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.त्यामुळे आठवड्याभरात जर राज्य सरकारकडून या संदर्भात परवानगी दिली गेली नाही तर भाजपच्या वतीने बोरिवली,दादर,सीएसटी, चर्चगेट आदी प्रमुख रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला.

Previous articleअजितदादांचा वाढदिवस : सुप्रियाताई सुळे देणार छत्र हरपलेल्या बालकांना मायेचा आधार
Next articleसर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केले; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा