मुंबई नगरी टीम
मुंबई : बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारने मंजूर केला. यावरून भाजपकडून महाविकास आघाडीवर सडकून टीका केली जात आहे. सरकार हे कंत्राटदार आणि विकासक धार्जिणे असल्याची टीका भाजपकडून होत आहे. तर भाजकडून केलेल्या जाणाऱ्या या टीकेला सत्ताधारीही जशास तसे उत्तर देत आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून काव्यात्मक शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याच काव्यात्मक शैलीचा वापर करून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केशव उपाध्ये यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले केशव उपाध्ये ?
लॅाकडाऊनमध्ये गोरगरीबांना कोणतीही सवलत न देणारे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणारे सरकार बिल्डरांना सर्व प्रकारच्या अधिमूल्यात ५० टक्के सवलत खैरातीचा निर्णय घेते हे पाहून एकच गाणे आठवते
“इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा
कंत्राटदांराना मणिहार
उध्दवा अजब तुझ सरकार.
कारण मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देत
कंत्राटदारांची बिल द्यायला सरकारकडे पैसे आहेत
खोट्या बिलांचे पैसे दिले जातात
पण मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत मिळत नाही
वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नाही”
सचिन सावंत यांचे उत्तर
“उघड डोळे बघ नीट केशवा,
तुझा शब्दच्छल आहे फसवा
अरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार,
नाठाळांच्या माथी धोंडा अन्
जनतेला मणिहार
मोदी कृपेने करोडो झाले बेरोजगार
भाजपासाठी बिल्डर असे मलिदा, आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगार
समाधानी आज राज्यातला बापडा,
म्हणतोय, मविआ ‘छे आपडा'”
दरम्यान, भाजप नेते आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रंगलेले हे ट्विटरवॉर काही नवीन नाही. मात्र केशव उपाध्ये आणि सचिन सावंत त्यांच्या काव्यात्मक अंदाजामुळे ट्विटरवरील या जुगलबंदीची चांगलीच चर्चा रंगली. शिवाय नेटकऱ्यांचेही चांगलेच मनोरंजन झाले असेल यात काही शंका नाही.