मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.दिल्लीत होणाऱ्या आरक्षणसंदर्भातील बैठकीला याचिकाकर्ते,वकील,सिनियर कौन्सिल आदींना घेऊन जाण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश न पाळता केवळ काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनाच घेऊन बैठकीला गेले.त्यामुळे अशोक चव्हाण हे आरक्षणाची भूमिका मांडत आहे की काँग्रेसची ? हे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.
विनायक मेटे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भाष्य केले. अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणसंबंधित सोमवारी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीवर त्यांनी यावेळी सडकून टीका केली. २५ जानेवारीला आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सर्व याचिकाकर्ते,वकील,सिनियर कौन्सिल यांची एकत्रित बैठक घेऊन सुनावणीबाबत रणनीती ठरवावी,असे सांगितले होते. परंतु, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळले नाहीत. काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांना घेऊन ते बैठकीला गेले, असा आरोप विनायक मेटेंनी केला आहे. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नापासून जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचे देखील ते म्हणाले.
अशोक चव्हाण यांनी बैठकीला महत्त्वाच्या लोकांना जाणीवपूर्वक बोलावले नाही,असे सांगतानाच चव्हाण आरक्षणाची भूमिका मांडत आहेत की काँग्रेसची, असा सवाल मेटेंनी उपस्थित केला. यावर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. गरीब मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ व्हावा, असे अशोक चव्हाण यांचे उपसमितीचे अध्यक्ष झाल्यापासून वर्तन दिसत नाहीत. त्यामुळे चव्हाण यांची आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून त्वरित हकालपट्टी करावी, या मागणीचा पुनरूच्चार विनायक मेटेंनी केला. आरक्षणाबाबत काही वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.