धनंजय मुंडे प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घेतली सावध भूमिका

मुंबई नगरी टीम

नाशिक : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या अत्याचाराच्या आरोपानंतर मुंडे यांनी समाज माध्यमातून करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाल्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी.मुंडे यांनी स्वत: कबुली दिली असल्याने,याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, अशी सावध भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे.

काल समाज माध्यमातून तक्रारीचे पत्र शेअर करीत एका महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.राज्यातील ठाकरे सरकारवर प्रत्येक मुद्द्यावर आरोपाची राळ उडवणारे भाजपचे नेते मात्र या प्रकरणी शांत होते.किरीट सोमय्या आणि भाजपच्या महिला पदाधिकारी वगळता भाजपच्या बड्या नेत्यांनी मुंडेंवर केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देणे टाळले होते.मात्र आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे प्रकरणी मौन सोडले आहे.या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी.मुंडे यांनी स्वत: कबुली दिली असल्याने,याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू,अशी सावध भूमिका त्यांनी घेतली आहे.मुंडे यांनी समाज माध्यमातून आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता असून, त्यातील जी कायदेशीर बाब आहे, मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचे सांगितले आहे. असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणाव. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आणले की,आम्ही आमची मागणी करु, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये.कितीही मोठा नेता असुदे दोषींना पाठिशी घालू नका असे सांगतानाच,जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे अशी मागणी वाघ यांनी केली आहे.अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबियांवर दबाव येऊ शकतो.पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते.तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे नैतिकता दाखवत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleधनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटील आक्रमक
Next articleग्रामपंचायत निवडणूक: कोरोनाबाधीत मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय