धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटील आक्रमक

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.त्यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यावा,अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर भाजपच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर आता चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

“सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडे यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भाजप महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील असे वाटत नाही”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, रेणू शर्मा या महिलेने केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी स्वतः सोशल मिडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. या सर्व तक्रारी खोट्या असून आपली बदनामी केली जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. मात्र आता भाजपने हे प्रकरण उचलून धरले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे यावर आता ठाकरे सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous articleधनंजय मुंडेंनी शरद पवारांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण
Next articleधनंजय मुंडे प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घेतली सावध भूमिका