धनंजय मुंडेंनी शरद पवारांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने एकीकडे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच धनंजय मुंडे यांनी सुरूवातीला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लडविले जात आहेत.या भेटीत शरद पवार- धनंजय मुंडे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी समाज माध्यमातून या प्रकरणी खुलासा केल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.स्वत: मुंडे यांनी खुलासा केल्याने त्यांच्या राजीनाम्यावर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच मुंडे यांनी आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला माध्यमांची नजर चुकवून हजेरी लावली.त्यापूर्वी मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी थेट सिल्वर ओक गाठून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेक चर्चेंना उधाण आले आहे.मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून या प्रकरणी आपली सविस्तर भूमिका मांडली असल्याचे सांगण्यात येते.

किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

दरम्यान धनंजय मुंडे प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.आपली दोन लग्न झाल्याचे आणि मुलं असल्याची कबूली मुंडे यांनी दिली आहे. मुंडे यांनी पत्नी आणि मुलांच्या नावे अनेक मालमत्ता घेतल्या आहेत.निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे दाखवल्याचे दिसत नाही,म्हणून निवडणूक आयोगाकडून या सर्व गोष्टींचा तपास व्हायला हवा, अशी तक्रार केली आहे, असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Previous articleखळबळजनक : महिलेने मंत्री धनंजय मुंडेंवर केला बलात्काराचा आरोप
Next articleधनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटील आक्रमक