….आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना विमानातून खाली उतरावे लागले

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमधील वाद काही कमी होताना दिसत नाही.विधान परिषद सदस्य नियुक्तीवरून राज्यपाल आणि सरकार आमने-सामने आलेले असतानाच आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला चक्क मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी दिली नसल्याचे समोर आले आहे.आश्चर्यकारक म्हणजे विमानात बसल्यानंतर राज्यपालांना ही परवानगी नाकारल्याचे समजते. त्यामुळे विमानातून खाली उतरून पुन्हा राजभवनात परतण्याची नामुष्की राज्यपालांवर ओढावली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच कुजबुज सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मसुरीला जायचे होते. यावेळी ते सरकारी विमानाने मसुरीला निघाले होते. मात्र राज्यपालांच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे राज्यपालांना विमान प्रवासाची परवानगीच दिली नसल्याचे समजत आहे. त्यानंतर राज्यपालांवर विमानातून खाली उतरून माघारी फिरण्याची नामुष्की ओढावली. या प्रकारानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारच्या माध्यमातून राज्यपालांचे विमान नाकारले असेल तर हे दमनकारी आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सरकारकडून असे घडले असेल तर माफी मागून हा विषय इथेच थांबवाव. एखाद्या अधिकाऱ्याकडून असे घडले असेल तर त्याला बडतर्फ करावे,अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच सरकारच्या सूड भावनेचा अतिरेक झाला आहे. राज्यपालांसोबत असे वागणे लोकशाहीला शोभणारे नाही. सूड भावना यांच्या नसानसात भिनली असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

Previous articleखुशखबर ! शासकीय आणि खाजगी परिचारिकांना मिळणार किमान समान वेतन
Next articleहवाई प्रवासाच्या वादावर राज्यपालांनी दिली पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले राज्यपाल !