मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने परवानगी नाकारण्यात आल्यानंतर मोठा वादंग उठला होता.परवानगी नसल्याने राज्यपालांना विमानतळावरून पुन्हा माघारी परतण्याची नामुष्की ओढावली होती. तर या प्रकारावरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारला धारेवर धरले होते.मात्र या सर्व वादावर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यासह मुख्यमंत्री सचिवालयाकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंड मधील मसुरीला लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या सांगता समारोपाला जायचे होते. त्यानुसार ते १० फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचले.मात्र उड्डाणाची परवानगी नसल्याने त्यांना पुन्हा राजभवनात परतावे लागले. यावर प्रतिक्रिया देताना सरकारी विमान न मिळाल्याने आपण खासगी विमानाने आलो, असे राज्यपाल म्हणाले. दरम्यान, एक आठवड्यापूर्वीच राज्यपाल सचिवालयाने २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून विमान प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही कळवण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी राज्यपाल विमानतळावर पोहोचले आणि विमानात बसले. मात्र, राज्यपालांना सरकारी विमानातून प्रवासासाठी परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर राज्यपाल खासगी विमानाने मसुरीला रवाना झाले.