मुंबई नगरी टीम
मुंबई । बीड जिल्ह्यातील तरूणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणी सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पूजा चव्हाण या तरूणीने रविवारी पुण्यात आत्महत्या केली.पूजा चव्हाणने विदर्भातील एका मंत्र्यासोबतच्या संबंधातून आत्महत्या केल्याची चर्चा असून हा मंत्री शिवसेनेचाच असल्याचे बोलले जात आहे.भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत मुख्यमंत्री ‘राठोडगिरी सहन करणार का ? असा प्रश्न विचारत संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असतानाच आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या प्रकरणी थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.सगळा घटनाक्रम पहाता याचा थेट रोख शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोडांकडे जातो.या प्रकरणी पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.मुख्यमंत्री जी एव्हढे पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय असे आव्हान वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
वाघ यांनी या प्रकरणी थेट मंत्री राठोड यांचे नाव घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.ऑडिओ क्लिप्स आणि फोटो पाहता ही आत्महत्या नसून हत्या आहे.यातून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत असल्याने वेगवेगळ्या माध्यमातून येणा-या बातम्या येत असल्याने याचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी वाघ यांनी केली केली आहे. एवढे पुरावे असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोणाची वाट पाहत आहात असा सवालही वाघ यांनी केला आहे. गेल्याच महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री अत्याचार प्रकरणी अडचणीत आला असतानाच आता पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजपने मंत्री राठोड यांच्यावर केलेल्या आरोपामुळे ठाकरे मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री अडचणीत सापडले आहेत.
माजी मुख्यमंत्री यांनी लिहिले पोलिस महासंचालकांना पत्र
पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण १२ ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत,त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय,त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले,असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.