गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते

मुंबई नगरी टीम

मुंबई । सचिन वाझेंमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा खळबळजनक दावा मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले परमबीर सिंग यांनी केला आहे.

सचिन वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारसह गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आल्यावर सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात येवून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची बदली का करण्यात आली याचे कारण सांगितले होते.दहशतवाद विरोधी पथकाच्या चोकशीतून काही गोष्टी पुढे आल्या आहेत.या बाबी माफ करण्यालायक नाहीत,अशा अक्षम्य गोष्टी आहेत त्यामुळे चौकशीत बाधा येवू नये म्हणून परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले होते.त्यानंतर कालच देशमुख यांनी नवी दिल्लीत जावून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली.मात्र दुसरीकडे गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा होती.मात्र या भेटीत या प्रकरणाची माहिती पवार यांना दिली आहे.तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पवार यांना सांगितल्याचे ट्विट देशमुख यांनी केले होते.

गृहमंत्री देशमुख यांच्या स्पष्टीकरणामुळे नाराज झालेले आणि मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून,त्यांत त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी या पत्रात केला आहे.गृहमंत्री देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून असे मिळून शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असे या पत्रात म्हटले आहे. प्रत्येक महिन्याला ही वसूली करण्याचे वाझेंना टार्गेट देण्यात आले होते, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.याबाबतचे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिले आहे.तर मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबीर सिंग यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

Previous articleनिर्बंधयुक्त लॉकडाऊन करा,पण कठोर लॉकडाऊन नको !
Next articleगृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे