राज्यात संपूर्ण लॉकडाऊन की कडक निर्बंध, मॉल,मल्टिप्लेक्स,नाट्यगृह बंद राहणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर येत्या दोन दिवसांत यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची चर्चा असतानाच,लॉकडाऊनबाबत निर्णय अद्याप झालेला नसला तरी गर्दी टाळण्यासाठी गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून, तीन दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत,अशा सूचना देण्यात आल्या होत्या.या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे,टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली होती.यावरून विरोधी पक्षांनी संभाव्या लॉकडाऊनला विरोध दर्शविला होता.तर सत्तेत असणा-या राष्ट्रवादीनेही या लॉकडाऊनला विरोध केला होता.मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेनंतर येत्या दोन दिवसांत लॉकडाऊन लागू केला जाणार अशी चर्चा होती.मात्र आरोग्यमंत्री टोपे यांनी याबाबत आज भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊनबाबत निर्णय अद्याप झालेला नसला तरी गर्दी टाळण्यासाठी गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसात लागू करण्यात येणारा लॉकडाऊन हा मागील लॉकडाऊन सारखा नसेल तर कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी २५ मार्च ते १४ एप्रिल असा २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता.पुढे हा लॉकडाऊन वाढवण्यात आला.या लॉकडाऊनमध्ये सर्वच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर दोन दिवसांनी लागू करण्यात येणा-या संभाव्य लॉकडाऊनमध्ये केवळ गर्दीची ठिकाणे बंद केली जाण्याची शक्यता आहे.मॉल,मल्टिप्लेक्स, उद्याने,नाट्यगृह अशी गर्दी होणारी ठिकाणे बंद केली जावू शकतात.गेल्या लॉकडाऊन मध्ये पूर्ण वेळ सगळ्याच गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या.या लॉकडाऊनमध्ये विशिष्ट वेळ दिली जावून, हा लॉकडाऊन आठ दिवसांचा असू शकतो.या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक गोष्टींना पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची मुभा दिली जावू शकते.राज्यातील अर्थचक्र सुरू रहावे यासाठी दुकानदार, शेतकरी यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाण्याची शक्यता आहे.तसेच आंतरजिल्हा वाहतूक सुरु ठेवण्याची शक्यता आहे.

Previous articleलॉकडाऊन करायचा असल्यास लोकांच्या खात्यात रोख रक्कम जमा करा;माजी मुख्यमंत्र्यांची मागणी
Next articleचौकशी समितीवरून देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिकांमध्ये जुंपली