तर कोरोनाचे जंतू देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते : सेना आमदाराचे वक्तव्य

मुंबई नगरी टीम

बुलडाणा : ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर औषधाच्या पुरवठ्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.त्यांचा हा वादग्रस्त व्हिडीओ सध्या समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली असतानाच ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर औषधाच्या पुरवठ्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपचे नेते एकमेकांवर चिखलफेक करीत असतानाच बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.त्यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते,तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावरुन राजकारण करु नये,असा थेट इशाराही आमदार गायकवाड यांनी दिला आहे.काल शनिवारी बुलडाण्यात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करीत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानावरून भर कोरोना संकटात आता राजकारण रंगण्याची चिन्हे आहे.

आमदार गायकवाड हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचाही खरपूस समाचार घेतला.केंद्रातील भाजप सरकारने राज्य सरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश,पाकिस्तान,नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले.असे सांगत कोरोनाच्या संकटात कोणीच राजकारण करु नये,असा टोलाही गायकवाडांनी लगावला आहे.कोरोनाच्या संकटामुळे जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित करतानाच तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. पण अगोदर माणसे जिवंत ठेवा,मगच राजकारण करा,असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकार मधील वादानंतर आता आमदार गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच रंगण्याची शक्यता आहे.

Previous articleकोरोनाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी
Next articleपहिला प्रयोग तुझ्या घर कोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर ! राणेंचे आमदार गायकवाडांना प्रत्युत्तर