राज्यातला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला; ३० एप्रिलला घोषणा करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी राज्यात येत्या १ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र मुंबई,पुणे या शहरातील रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी इतर भागात कोरोनाचा कहर कायम असल्याने राज्यात येत्या १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.याबाबतची घोषणा ३० एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात राज्य सरकारने १४ एप्रिल ते १ मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.मुंबई,पुणे आदी शहरातील रूग्ण संख्या अटोक्यात येत असली तरी राज्यातील काही भागातील परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्यात पुढील काही काळासाठी पुन्हा लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली होती.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन संदर्भात चर्चा झाली.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नसल्याने राज्यात अजून १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केल्याचे समजते.त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याचे समजते.त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असल्याने येत्या १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.सध्या असणा-या लॉकडाऊनचा कालावधी येत्या १ मे रोजी संपत असल्याने १५ मे पर्यंत वाढवण्यात येणा-या लॉकडाऊनची घोषणा ३० एप्रिलला करण्यात येणार आहे.या लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

Previous articleश्रेयासाठी जनतेला वेठीस धरू नका,अन्यथा जनता माफ करणार नाही
Next article१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस पण केव्हापासून ! आरोग्यमंत्र्यांनी केला खुलासा