मराठा समाजाची बाजू मांडण्यात ठाकरे सरकारला अपयश : प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम

बीड । फडणवीस सरकारने कायदा बनवून मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार आज सर्वोच्च न्यायालयात पूर्णपणे अपयशी ठरले.त्यामुळे मराठा समाजाचा भ्रमनिरास झाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज आला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारने केलेला कायदा रद्द केला आहे. या संदर्भात प्रविण दरेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.त्यावेळी दरेकर म्हणाले,सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यात ठाकरे सरकारला अपयश आलं असून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने सुरुवातीपासूनच अडचणी निर्माण केल्या. ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली असून मराठा आरक्षण देण्यामागची अपवादात्मक स्थिती ठाकरे सरकार न्यायालयासमोर भक्कमपणे मांडू शकली नाही,असा आरोप दरेकरांनी केला.मराठा आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, तिन्ही पक्षात नसलेली एकवाक्यता, न्यायालयात बाजू मांडण्यात केलेली हेळसांड, कमालीचा हलगर्जीपणा आणि मराठा आरक्षण कायद्याची बाजू भक्कम करण्याऐवजी केंद्र सरकारवर सतत केलेली टीका, यामुळे मराठा समाजाच्या आयुष्यात महाविकास आघाडी सरकारने अंधार निर्माण केला, या शब्दात दरेकर यांनी राज्य सरकारचा निषेध केला.

Previous articleमहाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले : चंद्रकांत पाटील
Next articleदेवेंद्र फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाची फसवणूक केली