राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन कायम ; कडक निर्बंध लागू

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचे संकट कायम असल्याने राज्य सरकारने येत्या १ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी या संदर्भातील आदेश जारी करीत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

मुंबई,पुणे आदी शहरातील कोरोना रूग्ण संख्या अटोक्यात येत असली तरी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सध्या लागू असलेले कठोर निर्बंध येत्या १ जून पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.त्यानुसार आज मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंध वाढवले जाण्याचे संकेत दिले होते.त्यानुसार आज मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून राज्य सरकारने निर्बंध अजून कठोर केले आहेत.बाहेरुन राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.राज्यात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात येवून,राज्यात प्रवेश करण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशा दोघांनाच परवानगी देण्यात आली आहे. जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करमार असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात येवून तो ४८ तासांच्या आत काढलेला असावा असेही या आदेशात म्हटले आहे.

Previous articleबापरे ! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियावर होणार ६ कोटींची उधळपट्टी
Next articleकोरोनाने वाचलो अन,महागाईने मेलो : रूपालीताई चाकणकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल