मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग । तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सिंधुदुर्ग दौरा केला.त्यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.कोकणाने नेहमीच शिवसेनेला भरभरुन दिले आहे.पण राज्य सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याची टीका दरेकर यांनी केली.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज देवगड आणि आचरा भागात वादळात झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.त्यावेळी माध्यमांसोबत बोलताना दरेकर म्हणाले,आपण सगळ्यांनी नेहमीच पाहिले आहे की, कोकणाने शिवसेनेला भरपूर दिले आहे. पण निसर्ग चक्रीवादळ असो की तौत्के वादळ त्याच कोकणवासीयांना देण्याची वेळ आली तेव्हा राज्यसरकार हात आखडता घेत आहे. संकटकाळात मदत करायची सोडुन काही मंत्री केंद्राकडे बोट दाखवण्यात व्यस्त आहेत.सरकार कोकणवासीयांना गृहीत धरत असुन कोकणवासीय जरूर सहनशील आहेत,परंतु जेंव्हा त्यांची सहनशक्ति संपेल तेव्हा कोकणवासीय रौद्र रूप धारण करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, तेव्हा शिवसेनेला कोकणात पायही ठेवता येणार नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टिका केली आहे.यावर बोलताना दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजूनही दिलेली नाही आणि संजय राऊत हे गुजरात राज्याला किती मदत मिळाली, हे पाहण्यात व्यस्त आहेत. राज्यसरकार म्हणून जे द्यायला पाहिजे ते देत नाही.पण दुसऱ्याकडे बोट दाखवून आपली निष्क्रियता झाकायची, या पलीकडे संजय राऊतांच्या व्यक्तव्याला अर्थ नाही. संजय राऊत यांना काय वाटतं याला फार काही महत्व देण्याचं कारण नाही. संजय राऊत यांना दिवस रात्र केंद्राच्या नावाने खडे फोडण्याची ड्युटी देण्यात आली आहे, अशी टिका दरेकर यांनी केली.तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी आहे.विरोधी पक्षनेते दौरा करत आहेत पण सरकारला कोकणवासीयांसाठी वेळ नाही. देवेंद्र फडणवीस यांचा दौऱ्यानंतर लाजेकाजेखातर का होईना मुख्यमंत्र्यानी दौरा केला. पण दुर्देव असे की,मुख्यमंत्र्यांनी तीन जिल्ह्यांसाठी तीन तास दिले.२-३ तासात कोकणवासीयांच्या काय व्यथा समजणार आहे.कोकण दौरा म्हणजे विमानतळावर येऊन बैठक घेतली, ती त्यांना मुंबईमध्येही घेता आली असती, अशी टीका दरेकर यांनी केली.

Previous articleविरोधी पक्षनेते वैफल्यग्रस्त : उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
Next articleकाँग्रेसकडून १११ ॲम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार : नाना पटोले