मोठी बातमी : शिवसेना राष्ट्रवादी आगामी निवडणूका एकत्रित लढविणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई । कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित राहावे याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे.त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने ‘सामना’ने मत व्यक्त केले आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यावर ‘सामना’ मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढतील असे वृत्त आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करीत असून,प्रत्येक पक्षाचे बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे असेही पाटील म्हणाले.निवडणूका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करु शकतील पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील असेही पाटील यांनी स्पष्ट केले.आता निवडणुका नाहीत त्यामुळे यावर रोज चर्चा कशाला करायची.ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी नक्कीच चर्चा करु.ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन चर्चा होईल असेही पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही मत व्यक्त केले.राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे अशा शुभेच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ उमेदवारांची यादी राज्यपालांकडे आहे. त्यावर विचार झालेला नाही.महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती परंतु यावेळी थोडासा विलंब झाला आहे मात्र आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देणे आणि दिर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा करणे एवढाच माझा आणि त्यांच्या भेटीचा विषय होता असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous articleमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य
Next articleथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मंत्री उदय सामंत यांनी केली मोठी घोषणा