अनिल देशमुखांना दणका; पीएस संजीव पलांडे,पीए कुंदन शिंदेंना ईडीची कोठडी

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून,ईडीच्या अटकेत असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना न्यायालयाने येत्या १ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.काल केलेल्या छापेमारीनंतर ईडीने या दोघांनाही अटक केली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटी वसूलीच्या आरोपांचा तपास करणा-या ईडीने कालच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील आणि नागपूरातील घरांवर धाडी टाकल्या होत्या.तसेच देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.या चौकशीनंतर ईडीने पलांडे आणि शिंदे यांना अटक केली होती.पीएमएलए कायद्याअंतर्गत या दोघांवर कारवाई करण्यात आली. काल रात्री त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आल्यानंतर आज दोघांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही येत्या १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली असल्याने देशमुख यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.काल ईडी अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील आणि मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला,वरळी येथील सुखदा इमारतीत असलेल्या घरांवर छापा टाकला होता. यानंतर ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

Previous articleवादाऐवजी संवादावर भर देणारा,समाजाचा चोहबाजुनी रक्षण करणारा व्यक्तीच खरा नेता
Next articleधार्मिक स्थळे,पर्यटन स्थळे आणि हॉटेलसाठी नियमावली जाहीर