फडणवीस…सत्ता आली किंवा खुर्ची मिळाली तरच काम करणार का ? जयंत पाटलांचा टोला

मुंबई नगरी टीम

नांदेड । ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या वतीने काल राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.त्यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आव्हान देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सत्ता द्या ४ महिन्यात ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देतो, नाही तर राजकारणातून संन्यास घेईन,अशी गर्जना केली होती.त्याचा समाचार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे.

आज नांदेड येथे पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा आणि ओबीसी आरक्षणावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे.काल भाजपच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.नागपूर येथे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारला आव्हान देत, सूत्रे आमच्या हातात द्या, ४ महिन्यात ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दाखवतो,नाही तर राजकारणातून संन्यास घेईल,अशी गर्जना केली होती.फडणवीसांच्या या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे.राज्याच्या सत्तेत पुन्हा आल्यावर ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा,तो प्रश्न आम्ही सोडवू,त्याकरीता तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही.राज्यातील जनतेने तुम्हाला नाकारले आहे.असा टोला लगावतानाच,सत्तेत आल्याशिवाय काहीच करायचे नाही का ? असा सवालही पाटील यांनी फडणवीसांना केला आहे. सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही,मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन,सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही अशा शब्दात पाटील यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

सत्ता आली किंवा खुर्ची मिळाली तरच काम करणार, नाहीतर नाही असा जो फडणवीस यांचा हट्ट आहे हे योग्य नाही.असे वक्तव्य महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांनी केलेले नाही याची आठवण पाटील यांनी करुन दिली.ओबीसी समाजाबद्दल भाजपला आज जो कळवळा निर्माण झाला आहे. मात्र यांच्यामुळे भुजबळांना तुरुंगात खितपत पडून राहावे लागले. एकनाथ खडसेसारखे ओबीसी नेते पक्षातून बाहेर काढले गेले. एकंदरीत भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही असा प्रयत्न भाजपकडून झाला. ओबीसी समाजाची चळवळच संपवण्याचे काम करण्यात आले असा गंभीर आरोपही पाटील यांनी यावेळी केला. राजकारणात उद्या नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल अशी भीतीही पाटील व्यक्त केली.

एनआयएने मनसुख हिरेन यांच्या हत्येच्यादृष्टीने मेन टार्गेट ठेवले पाहिजे. परंतु त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन त्यादृष्टीने सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार देशात भाजपने सुरू केलेला दिसतो असा थेट आरोपही पाटील यांनी यावेळी केला.परमवीरसिंग यांना आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आरोप केला आहे म्हणजे याअगोदर त्यात तुम्ही सहभागी होतात का ? असा प्रश्न निर्माण होत आहे असेही पाटील म्हणाले. कुणीतरी ‘अ’ आणि ‘ब’ चं नाव घेत असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर ही अत्यंत चुकीची पध्दत आहे.असेच घाबरवण्याचे काम केंद्रसरकारच्या एजन्सी करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम सुरू झाले आहे असे गंभीर विधानही पाटील यांनी यावेळी केले.

Previous articleधार्मिक स्थळे,पर्यटन स्थळे आणि हॉटेलसाठी नियमावली जाहीर
Next articleफडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द: काँग्रेसचा हल्लाबोल