गेल्या १६ महिन्यात ठाकरे सरकारने प्रसिद्धीवर उधळले तब्बल १५५ कोटी

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनामुळे अनेक तरूणांच्या नोक-या गेल्या आहेत तर अनेक जण बेरोजगार झाले आहेत.सर्वसामान्य जनता महामारीमुळे अक्षरश: मेटाकुटीला आली असताना दुसरीकडे राज्यातील ठाकरे सरकारने गेल्या १६ महिन्यात प्रसिद्धीवर तब्बल १५५ कोटी रूपयांची उधळपट्टी केल्याची बाब समोर आली आहे.विशेष बाब म्हणजे या एकूण खर्चात ५ कोटी ९९ लाख रूपये समाज माध्यमांवर खर्च करण्यात आले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.त्यानंतर मार्च महिन्यात सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अघिवेशनाच्या दरम्यान राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला.साधारणत: महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येवून दीड वर्षे पूर्ण गेली आहेत.दुसरीकडे कोरोनाच्या संकटामुळे आणि सततच्या टाळेबंदीमुळे राज्यातील सर्वासामान्य जनता अक्षरश: मेटाकुटीला आली असताना राज्यातील ठाकरे सरकारने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी गेल्या १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल १५५ कोटी खर्च केल्याची बाब माहिती अधिकारात पुढे आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे.या खर्चात जवळपास ५ कोटी ९९ लाख हे समाज माध्यमांवर खर्च केले आहे. प्रत्येक महिन्याला प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकार ९ कोटी ६ लाख खर्च करीत असल्याचे पुढे आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून आजमितीला प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अनिल गलगली यांस ११ डिसेंबर २०१९ ते १२ मार्च २०२१ या १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर केलेल्या खर्चाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे.यात २०१९ मध्ये २० कोटी ३१ लाख खर्च करण्यात आले असून नियमित लसीकरण प्रचारावर सर्वाधिक १९ कोटी ९२ लाख खर्च केले आहे.२०२० मध्ये एकूण २६ विभागाच्या प्रसिद्धी मोहिमेवर एकूण १०४ कोटी ५५ लाख खर्च करण्यात आले आहेत.यात महिला दिनानिमित्त प्रसिद्धी मोहिमेवर ५ कोटी ९६ लाख खर्च करण्यात आले आहे. पदुम विभाग ९ कोटी ९९ लाख,राष्ट्रीय आरोग्य अभियानावर १९ कोटी ९२ लाख,विशेष प्रसिद्धी मोहिमेवर ४ टप्प्यात २२ कोटी ६५ लाख खर्च करण्यात आले आहे.यात १ कोटी १५ लाखांचा खर्च हा समाज माध्यमांवर करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र नागरी विकास अभियानावर ३ टप्प्यात ६.४९ कोटी खर्च करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने निसर्ग चक्रीवादळावर ९ कोटी ४२ लाख खर्च केले असून यात २ कोटी २५ लाखाचा खर्च हा समाज माध्यमांवर केल्याचे दर्शविले आहे.राज्य आरोग्य शिक्षण विभागाने १८ कोटी ६३ लाख प्रसिद्धीवर खर्च केले आहेत. शिवभोजनाच्या प्रसिद्धी मोहिमेवर २० कोटी ६५ लाख खर्च केले असून ५ लाखांचा खर्च समाज माध्यमांवर केला आहे.

२०२१ मध्ये १२ विभागाने २९ कोटी ७९ लाखांचा खर्च १२ मार्च २०२१ पर्यंत केला आहे. यात परत एकदा राज्य आरोग्य शिक्षण विभागाने १५ कोटी ९४ लाख प्रसिद्धीवर खर्च केले आहे. जल जीवन मिशनच्या प्रसिद्धी मोहिमेवर १ कोटी ८८ लाख खर्च केले असून ४५ लाखांचा खर्च हा समाज माध्यमांवर केला आहे. महिला व बाल विकास विभागाने २ कोटी ४५ लाखांच्या खर्चात २० लाख रूपये हे समाज माध्यमावर खर्च केले आहेत. अल्पसंख्याक विभागाने तर कहर करत ५० लाखांपैकी ४८ लाख खर्च हा समाज माध्यमांवर केला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ३ कोटी १५ लाखाच्या खर्चात ७५ लाख समाज माध्यमांवर खर्च केले आहे.गलगली यांच्या मते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे शंभर टक्के माहिती उपलब्ध नसल्याने ही आकडेवारी अधिक होऊ शकते.समाज माध्यमांच्या नावाखाली केलेला खर्च संशयास्पद आहे.त्याचशिवाय क्रिएटिव्हच्या नावाखाली दाखविलेल्या खर्चाचा हिशोब वेगवेगळया शंकांना वाव देत आहे. विभाग स्तरावर केलेला खर्च,खर्चाचे स्वरुप आणि लाभार्थीचे नाव संकेतस्थळावर शासनाने अपलोड करावे, अशी मागणी गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे

Previous articleराफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा
Next articleपावसाळी अधिवेशन: मराठा,ओबीसी आरक्षण,लॉकडाऊन,शेतकऱ्यांचे प्रश्न गाजणार