ओबीसींच्या आरक्षणाबाबत भाजपाची भूमिका विचारण्याचा अन्य पक्षांना नैतिक अधिकार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशाच्या इतिहासात प्रथमच २६ ओबीसी केंद्रीय मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हे करून दाखविले आहे.त्यामुळे ओबीसी समाजाविषयी आम्हाला किती कळवळा हे दुसऱ्यांनी शिकवण्याचे कारण नाही.देशातील पंतप्रधान स्वतः ओबीसी समाजाचे आहेत,त्यामुळे त्या पक्षाला,नेत्याला ओबीसी समाजाविषयी शिकवण्याची गरज नाही,असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप आमदार राजेश पवार आणि पूनम राजेश पवार यांच्या संकल्पनेतून नावारूपास आलेल्या ‘देवगाथा’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहित विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की,भाजप हा एकमेव असा पक्ष आहे ज्यांनी ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्यभर एकाच वेळेला हजार ठिकाणी आंदोलने उभी केली आणि ओबीसी समाजाच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत, हे ठासून सांगितले. त्यामुळे इतर पक्षाला किंबहुना त्या पक्षातील नेत्यांना भाजपला ओबीसी समाजाविषयीची भूमिका विचारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे दरेकर यांनी ठणकावून सांगितले.

दरेकर म्हणाले,ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले आहे,त्याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. भाजप सरकारने किंबहुना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्याचे काम केले होते.तसेच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाविषयी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले असून, स्वतंत्र बजेट ठेवण्यात आले, अनेक योजना आखल्या गेल्या.सरकार म्हणून समाजाला चांगल्या दिशेने ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला,त्यामुळे ओबीसी समाजाविषयी भाजपचे काही देणेघेणे नसल्याचे केवळ चित्र उभे केले जात असून केवळ आपले अपयश झाकण्यासाठी ओबीसी आरक्षण भाजपने घालवले, अशा प्रकारचा आरोप मविआकडून केला जात आहे. भाजप पक्षाला ओबीसी समाजाचे मोठे योगदान असून भाजप ओबीसी राजकीय आरक्षणासाठी लढा देत असून ओबीसी समाज एकत्रितपणे भाजपच्या झेंड्याखाली कसा येईल यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous articleवाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले महत्वाचे आवाहन
Next articleगावातील पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या वीज जोडण्या पूर्ववत करणार