मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे -तुरे’चे शब्द वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही:अजितदादांनी टोचले राणेंचे कान

मुंबई नगरी टीम

मुंबई । चिपळूणच्या पूरग्रस्त दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संताप व्यक्त करणा-या केंद्रीयमंत्री नारायण यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे तुरे’चे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,अशा शब्दात अजित पवार यांनी नाव न घेता भाजपच्या नारायण राणे यांचे कान टोचले आहेत.
अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात पूराचे शिरून व्यापा-यांचे मोठे नुकसान झाले आहे.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह चिपळूणचा दौरा केला.त्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला होता.व्यापाऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच झापले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करीत सीएम वगैरे गेला उडत.. इथे तुम्ही का नाही ते सांगा अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला होता.राणे यांच्या या वक्तव्याचा समाचार आज उपमुख्यमंत्री पवार यांनी नाव न घेता घेतला आहे.नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे – तुरे’ चे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात त्यांनी भाजपच्या नेत्यांचे कान टोचले.मुख्यमंत्री एखादी पाहणी करण्यासाठी जातात त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतात.मग कुणीही मुख्यमंत्री असेल तर तसेच होणार.नैसर्गिक संकटकाळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात असा सल्लाही पवार यांनी भाजपला यावेळी दिला.

पाच वर्षे सत्तेत नसताना संकट आल्यावर आम्ही पाहणी करायला जात होतो,त्यावेळी मी जिल्हाधिकारी आले नाही… प्रांत कुठे गेला…मामलेदार कुठे आहे असे कधीही म्हटले नाही किंवा विचारले नाही.अरे तुम्ही जिल्हाधिकारी,मामलेदारांना बघायला आलात की जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलात असा संतप्त सवालही पवार यांनी केला आहे.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला त्यानंतर जी परंपरा महाराष्ट्राला लाभली तेव्हापासून मोठमोठे लोक राज्याचे प्रमुख झाले.त्यामध्ये यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,शरद पवार,शंकरराव चव्हाण,विलासराव देशमुख यांचा काळ आठवला तर कधीही अशापध्दतीने मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार त्याकाळातील विरोधी पक्षांच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षनेत्यांनी काढले नव्हते याची आठवणही उपमुख्यमंत्री पवार यांनी भाजपला करुन दिली.राज्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तिथल्या जिल्हाधिकारी व बाकीच्या टिमला त्यामध्ये प्रांत,चीफ अधिकारी यांना काम करण्यास मुभा द्यावी. वेगवेगळ्या नेत्यांना पाहणी करण्याचा अधिकार आहे.महत्वाच्या व्यक्ती पाहणी करायला गेल्यावर लवाजमा फिरत राहतो त्याचाचा कामावर परिणाम होतो म्हणून त्यांना माहिती मिळावी यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

काही भागात आजही पूराचे पाणी भरलेले आहे.त्यामुळे पंचनामे करण्यास अडचण निर्माण होत आहे मात्र पाणी कमी झाल्याशिवाय त्या भागातील शेती पिकाची काय अवस्था आहे हे कळू शकणार नाही.त्यामुळे जिथे पाणी ओसरले आहे त्याठिकाणी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.त्या – त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्या कामाकरिता जेवढी रक्कम खर्च करावी लागेल ती खर्च करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वासही पवार यांनी यावेळी दिला. हवामान खात्याने अजूनही रेड आणि ऑरेंज अलर्ट दिले आहेत. निसर्गातील बदलाचे काही सांगता येत नाही.ग्लोबल वार्मिंगमुळे इथे घडतंय असं नाही. उत्तराखंडमध्येही घडतंय.जगातील चीन, जर्मनी यासारख्या देशातही घडत आहे. अर्थात याबाबत सर्वांनी विचार करावा असेही पवार म्हणाले. याबाबत कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. भूगर्भात काही बदल होतायत का ? ज्याठिकाणी हे घडलं त्याठिकाणी कोणतंही खोदकाम किंवा वृक्षतोड झालेली नव्हती मग हे का घडलं याचा अभ्यास करण्याकरीता तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Previous articleसरकारचा मोठा दिलासा: खासगी शाळेची फी १५ टक्क्यांनी कमी होणार
Next articleआशा भोसले या संगीतातील एक चमत्कार आणि दैवी शक्ती