सरकारचा मोठा दिलासा: खासगी शाळेची फी १५ टक्क्यांनी कमी होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोना संकटात सापडलेल्या पालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज फी कपातीच्या निर्णयाला मंजूरी दिल्याने खासगी शाळांची फी १५ टक्क्यांनी कमी होणार आहे.या निर्णयामुळे आता पालकांना ८५ टक्केच फी भरावी लागणार आहे,तर ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे,त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.

खासगी शाळांची फी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसला तरी कोरोनाच्या संकटात राज्यातील शाळा बंदच आहेत.तर राज्य सरकारने राजस्थान प्रमाणे १५ टक्के फी कमी करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती.राज्यात टाळेबंदी असतानाही खासगी शाळा फी भरण्याच्या सक्ती करीत होत्या.त्या विरोधात पालकांनी आंदोलने करीत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.राज्य सरकारने १५ टक्के फी कमी करण्याचा निर्णय घेतला असून,ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.ज्या खासगी शाळा हा निर्णय मान्य करणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Previous articleपूरग्रस्तांसाठी झटणारे मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल
Next articleमुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे -तुरे’चे शब्द वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही:अजितदादांनी टोचले राणेंचे कान