मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट; काय झाली चर्चा ?

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर । कोल्हापूरच्या पुरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरचा दौरा केला.तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज कोल्हापूरच्या दौ-यावर आहेत.फडणवीस हे शाहुपुरीत पाहणी करीत असल्याचे समजताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना निरोप पाठवून भेटण्यासाठी थांबण्याची विनंती केली.मुख्यमंत्र्यांच्या या निरोपानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि काही वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये मदतीबाबत चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर मधिल पुरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी यावेळी शिरोळ येथिल नरसिंहवाडी, गंगावेश,शिवाजी पूल येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल सातारा,सांगली भागातील पाहणी करण्यासाठी दौ-यावर होते.तर आज ते कोल्हापूर मधिल पाहणी करण्यासाठी विविध भागांना भेटी देत होते.फडणवीस शाहुपुरीतील पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना तेथेच थांबण्याचा निरोप दिला.मुख्यमंत्र्यांच्या या निरोपानंतर फडणवीस हे त्याच ठिकाणी थांबले काही वेळात मुख्यमंत्री तेथे आले आणि या दोन नेत्यांची भेट झाली.या भेटीत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केल्याचे सांगिण्यात येते.फडणवीस यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.मदतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली तर आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहू असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.काही वेळेसाठी झालेल्या या भेटीनंतर फडणवीस शाहुपुरीतून पुढे जाण्यास निघाले असता मिलिंद नार्वेकरांनी त्यांना गर्दीतून त्यांना वाट मोकळी करून दिली.
मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

नागरिकांनो ! घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहुपूरी 6 व्या गल्लीतील पूरबाधित राहिवाशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापूरात आले होते.यावेळी स्थानिक रहिवासी पूजा नाईकनवरे यांनी, आपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले .तर पूरबाधित गणेश पाटील म्हणाले, यंदा २००५ व २०१९ पेक्षाही मोठा असून शासनाने भरीव मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केलीयावेळी पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे,जिल्हाधिकारी राहूल रेखावार,मनपा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

Previous articleवाचा : ‘या’ २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार तर ११ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल कायम राहणार
Next article…तरच मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा सार्थकी लागेल ! मुख्यमंत्र्यांना दरेकरांचा टोला