नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय ? नाना पटोले यांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे.मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे,असे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे.त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता, त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही त्यांचे नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हिन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान व करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठे असून अशा पद्धतीने ते स्थान तसुभरही कमी होणार नाही.

राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय ? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडीयमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचे नाव देता आले असते परंतु त्याचे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम केलेच,त्यामुळे राजीव गांधी यांचे नाव बदलल्याने आश्चर्य वाटत नाही, ही कृत्ती भाजपा व संघाच्या द्वेषमुलक वृत्तीतून आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूद कमी करायची आणि दुसरीकडे आपले सरकार क्रीडा क्षेत्र व खेळाडूंचे किती हित जपते हे दाखवण्यासाठी असे केविलवाणे काम करायचे, यातून क्रीडा क्षेत्राचा अथवा खेळाडूंचा कोणताच फायदा होणार नाही, असेही पटोले म्हणाले.

Previous articleरेल्वे आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची ! मुस्कटदाबी सहन करणार नाही
Next articleमुख्यमंत्र्यांचा ‘तो’ शिक्षकांसोबतचा फोटो तुफान व्हयरल,चर्चा मुख्यमंत्र्यांच्या विनम्रतेची