मुंबई नगरी टीम
मुंबई । कोल्हापूरातील नुकसानग्रस्त भागाच्या दौ-यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या कानातील चर्चेनंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत जावून वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेटीनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंपांच्या चर्चांना उधाण आले आहे.विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते.
कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही कोल्हापूरात असल्याचे समजताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना भेटण्यासाठी निरोप पाठवला होता.त्यानुसार या दोन नेत्यांची भेट झाली.या भेटीत फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काही तरी सांगितले.मात्र या दोन नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली ते समजले नाही.गेल्याच आठवड्यात राज्यातील भाजपच्या डझनभर नेत्यांनी दिल्लीवारी केली. यावेळी फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून चर्चा केली.भाजपच्या नेत्यांची दिल्लीवारी संपल्यानंतर आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली.राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अनेक कुटुंब उध्दवस्त झाली आहेत.त्यांना उभारी मिळावी यासाठी मुंबईतील सहकार संस्थांच्यावतीने पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी दीड कोटीचा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. यावेळी मुंबई बॅंकेचे संचालक आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम संपताच दरेकर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते.माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय दरेकर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.